सदगुरु श्री गुरुलिंगजंगम महाराज चरित्र भाग -१

सिद्धसंप्रदायाची परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी काडसिद्धांनी ज्यांची निवड केली, ते निंबरगीकरमहाराज होत. त्यांचेसर्व आयुष्य निंबरगीत गेले म्हणून निंबरगी गावाबद्दल बोलताना, धन्य ते स्थळ महासिद्धाचे,’ असे चिमडचे रामभाऊमहाराजयरगट्टीकर म्हणतात. निंबरगीकरमहाराजांच्या वास्तव्याने निंबरगी हे खेडेगाव एक पुण्यक्षेत्रआणि तीर्थक्षेत्र झाले. म्हणूनच, ‘धन्य निंबरगी क्षेत्र भूतळी असे तात्यासाहेब कोटणीसयांनी गौरवोद्गार काढले आहेत.निंबरगी व मारुति मंदिर कर्नाटक राज्यात विजापूर जिल्ह्यातील इंडी नावाच्या तालुक्यात निंबरगी अथवा लिंबरगी हे एक खेडेगाव आहे. त्यालाच देव-निंबरगी असेही नाव आहे. निंबरगी जवळ एक ओढा आहे. ओढ्या पलीकडे मारुतीच्या चतुर्भुज मूर्तीचे स्वयंभूदेवस्थान आहे. देवळाच्यादर्शनी भागी नगारखाना असून, भोवती असणाऱ्या तटाच्या आतील बाजूस सेवेकऱ्यांसाठीओवऱ्या आहेत. याच मंदिरात प्रवचने करून निंबरगीकर महाराजांनी काडसिद्धांकडून प्राप्तझालेल्या सिद्धसाधनाचा आविष्कार केला.महाराजांचे जनन व काडसिद्धांचा अनुग्रह लिंगायत धर्मातील नीलवाणी हा जातिभेद असणारे मिसलकर उपनामाचे घराणे निंबरगीत वास्तव्य करून होते. या कुळात कोष्टीपण, निळारीपण आणि शेती हे व्यवसायहोते. या कुळात महाराजांनी अवतार घेतला. महाराजांच्या पित्याचे नाव भीमण्णा आणिमातेचे नाव सौ. अंबाबाई. सोलापूरला मातुलगृही शके १७१२(= इ. स. १७९०) मध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीला महाराजांचे जननझाले, तोच सूतिकागृहात बराच वेळ प्रकाश भरून राहिला.महाराजांचे जन्मटिपणावरून झालेले नारायण हेच नाव प्रचारात आले. नंतर त्यांना भाऊ म्हटले जाऊ लागले. त्यामुळे नारायणराव भाऊसाहेब नीलवाणी किंवा नीलगार अथवा निंबरगीकर असे त्यांचे नाव व्यवहारात आले. नीलवाणी हे जाती वरून आलेले नाव. नीलगार हे व्यवसाया वरून पडलेले नाव. तर निंबरगीकर हे ग्रामनावा वरून पडलेले उपनाम. पुढे महाराज सिद्ध पदवीला पोचल्यावर ते गुरुलिंगजंगमस्वामी या नावाने विख्यात झाले. महाराजांनी आपल्या काव्यरचनेत ‘गुरुलिंगजंगम’ अशी मुद्रिका वापरली आहे.शिष्याच्या शोधात असणारे काडसिद्ध हे एका जंगमाच्या रूपात महाराजांचा शोध घेत सोलापूरला महाराजांच्या मातुलगृही आले व वयाच्या पाचव्या दिवशी मुलाच्या कानात मंत्र सांगून त्यांनी मुलाची लिंगधारणा केली.
बालपण,
शिक्षण व विवाहयोग्य वेळी शाळेत जाऊन महाराज लिहिण्यावाचण्यास शिकले. त्यांचे शालेयशिक्षण फारसे झाले नाहीच. पण लहानपणापासून ते सत्य, हित व प्रिय बोलणारे असूनपरोपकारी आणि निरहंकारी होते.वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी त्यांनी शेतीकामाची ओळख करून घेतली.तसेच उत्तम नीळ तयार करून सूत रंगविण्यात ते तरबेज झाले.योग्य वेळी भीमण्णांनी महाराजांचा विवाह करून दिला. त्यानंतर काहीकारणाने त्यांचा दुसरा विवाह झाला. त्यांची दुसरी पत्नी कल्याण कलबुरगेकडील होती;तिचे नाव लक्ष्मी. तिचेपासून महाराजांना भीमाण्णा हा पुत्र झाला. अशा प्रकारेव्यावहारिक जीवन जगण्यात महाराजांचा काळ जात होता. कालांतराने महाराजांचेवडील कालवश झाले. तेव्हा भावाभावांच्या वाटण्या झाल्या. होती ती शिल्लक वडिलांचे अर्धे कर्ज महाराजांच्या थोरल्या भावाने घेतले पण महाराजांच्याकडे फक्त वडिलांचे निम्मे कर्ज आले. त्यानंतर महाराजांनी स्वत: कर्ज काढून आपला धंदा वाढविलाआणि लवकरच आपले व पित्याचे कर्ज फेडून टाकले. मग जगरहाटीप्रमाणे महाराजांचेसांसारिक जीवन चालू राहिले.नाठवी तो स्वये द्यावी आठवणहा वेळपावेतो महाराजांना अगदी बालपणी झालेल्या काडसिद्धांच्या अनुग्रहाची विस्मृती पडली होती. परंतु ते काडसिद्धांना चालणारे नव्हते. म्हणून निंबरगीकर महाराजांना आठवण करून देण्याचे काडसिद्धांनी ठरविले.एका वयातीत पुरुषाच्या रूपात, घोड्यावर स्वार होऊन काडसिद्ध महाराजांच्या घरी आले. घोड्याला पाणी पाजण्यास त्यांनी घंगाळ व घागर मागितली.त्या वस्तू मिळताच, एका हातात घंगाळ अधांतरी धरून त्या वयस्क पुरुषाने दुसऱ्या हाताने पाण्याने भरलेली घागर घंगाळ्यात रिकामी केली. ते अचाट कृत्य पाहून महाराजांच्या मनावर परिणाम झाला. तितक्यात त्या पुरुषाने प्रश्न केला, “आम्ही सांगितलेल्या गोष्टीचा तुम्हाला विसर पडला काय?” प्रश्न ऐकताच महाराजांची खात्री झाली की, हे वयस्कर गृहस्थ म्हणजे काडसिद्ध आहेत. काडसिद्धांच्या पाया पडून महाराज.म्हणाले, “माझी साधनसिद्धता करून देण्याचे आश्वासन आपण द्यावे. मग मी साधनाभ्यासाला लागतो.” “तथास्तु,” म्हणून काडसिद्ध तेथल्या तेथे घोड्यासह अदृश्यझाले.
पुनरपि अनुग्रह
पहिल्या अनुग्रहाची विस्मृती पडली असल्याने महाराज सिद्धगिरीस केले वपुन्हा काडसिद्धांकडून सिद्धसाधन समजावून घेऊन परत आले. परंतु नंतरही त्यांचेहातून साधन घडले नाही. अशीच पाचसहा वर्षे गेली. पुन्हा सिद्धगिरीहून काडसिद्धएका जंगमाच्या रूपात घोड्यावर बसून महाराजांकडे आले. त्यांना भोजन घालूनमहाराजांनी दक्षिणा दिली. जाताना जंगम बोलला, “तुम्ही पुन्हा विसरलेले दिसता.असे करू नका. आता साधन करू लागा.” तेव्हा महाराजांनी विचारले, “परमार्थकेल्याने प्रपंचही सुखाचा होतो काय ?” “देवाच्या कृपेला काय अशक्य आहे ?”काडसिद्ध उत्तरले. ते निघून गेले. यावेळी महाराजांना एकविसावे वर्ष होते. यापुढे मात्रत्यांनी दृढ निश्चयाने साधन सुरू केले.+निंबरगीकरमहाराजांचे गुरू काडसिद्धसिद्ध संप्रदायातील काडसिद्ध हे निंबरगीकरमहाराजांचे सद्गुरू होते. त्यामुळे,”महाराजांना उपदेश करणारे मुप्पीनमुनी असावेत असे दिसते; तसेच महाराजांच्याएका पदातील मुप्पीनमुनींचा उल्लेख त्यांच्या गुरूच्या नावाचा असण्याचा संभव आहे”(बोधसुधा, पृ.८-९), असे जे म्हटले जाते, ते बरोबर नाही. कारण महाराजांचे गुरूमुप्पीनमुनी, असे म्हणण्यास केवळ अंदाजापलीकडे दुसरा कोणताच भक्कम आधारनाही. वरील ‘संभव आहे’ या शब्दांवरून अनिश्चितता सूचित होते. तसेच महाराजांच्याज्या पदात मुप्पीनमुनी हा शब्द येतो, तेथे तो शब्द महाराजांच्या गुरूचा उल्लेख करणारानाही, असे र. ह. कोटणीस यांनी ‘कैवल्यप्रसाद’ ग्रंथात (पृ. १७) दाखवून दिले आहे.काडसिद्ध हेच निंबरगीकरमहाराजांचे गुरू, अशी या संप्रदायातील परंपराआहे आणि चिमड व इंचगिरी या शाखांतीत लेखनांत काडसिद्ध हेच महाराजांचे गुरू,असा उल्लेख येतो. इंचगिरी संप्रदायातील ‘पंचसमासी’ हा लघुग्रंथ उमदीकरांच्या नजरे खालून गेला असल्याने, त्यातील वचनांची सत्यता नि:संदेह मानली पाहिजे, असेवि. चिं. केळकर सांगतात (पाहा : निंबरगी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय, सज्जनगडमासिक, श्रीसमर्थ रामदासस्वामी विशेषांक, फेब्रुवारी, १९८२). पंचसमासीत पहिल्यासमासात निंबरगीकरमहाराजांचे चरित्र सांगताना, ‘जंगमरूपे काडसिद्ध उपदेशिले,’असे स्पष्ट वचन आहे. तसेच इंचगिरी संप्रदायाच्या ‘नित्यनेमावलि’ च्या पहिल्याआवृत्तीच्या प्रस्तावनेतही काडसिद्धांचे शिष्य निंबरगीकरमहाराज’ असा उल्लेख आहे.चिमड संप्रदायाच्या सर्व ग्रंथांत काडसिद्ध हे निंबरगीकरमहाराजांचे गुरू, असे म्हटलेले आहे. तसेच निंबरगीकरमहाराजांच्या सान्निध्यात प्रदीर्घ काळात राहिलेल्या अशा महायोगिनी लक्ष्मीबाई अक्कांनीही ‘काडसिद्ध हेच निंबरगीकरमहाराजांचे गुरू,’ असे सांगून ठेवले आहे. खेरीज निंबरगीकरमहाराजांनी कृपावंत होऊन, आपल्या निर्याणानंतरज्यांना ‘गुरुलिंगगीता’ हा प्रासादिक ग्रंथ दिला, ते दादामहाराज केळकरही आपल्या’सिद्धकथामृतसार’ या ग्रंथात लिहितात : “काडसिद्धे सत्-शिष्यावरी।कलियुगामाझारी। अनुग्रह केला निर्धारी। श्रीगुरुलिंगजंगमा॥” हे सर्व लक्षात घेतलेकी काडसिद्ध हेच निंबरगीकरमहाराजांचे सद्गुरू, यात संदेह राहात नाही. क्रमशः